चाळीसगाव तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यात वैद्यकीय पदवी नसतांना चुकीच्या पद्धतीने उपचार करणाऱ्या तोतया डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा विविध वैद्यकीय संघटनांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

चाळीसगाव शहरासह तालुक्यात परप्रांतीय बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जवळ कुठल्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नाही. तरीही या तोतया डॉक्टरांकडून चुकीच्या पद्धतीने उपचार केला जातो. परिणामी रूग्णांच्या जीवाशी खेळला जातो आहे. अशा बोगस डॉक्टरांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन/ निमा, चाळीसगाव होमोपॅथिक वैद्यकीय संघटना व चाळीसगाव तालुका जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन या वैद्यकीय संघटनांनी तहसीलदार अमोल मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लांडे यांच्याकडे मंगळवार, दि. २४ मे रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

यात कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यामुळे तोतया डॉक्टरांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी सदर बेकायदेशीर डॉक्टर वर्षानुवर्षे वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. यावर कोणाचाही अंकुश किंवा वचक नाही. त्यामुळे हे डॉक्टर कोणाच्या आशिर्वादाने वैद्यकीय व्यवसाय थाटले आहे. असा सवालही तालुक्यातील वैद्यकीय संघटनासह डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.

निवेदन देतांना डॉ. सुजित वाघ, डॉ. राजमल कोतकर, डॉ. प्रवीण भोकरे, डॉ. नंदकुमार महाले, डॉ. मनोहर भामरे, डॉ. संदीप देशमुख, डॉ. संतोष राठोड, डॉ. महेंद्रसिगं राठोड, डॉ. दीपक पवार, डॉ. बी. बी. चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Protected Content