शेतकऱ्यांच्या सामुहिक मागणीला वनविभागाकडून दाद; लवकरच मिळणार झटका मशीन

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वन्यप्राण्यांकडून वारंवार होणाऱ्या शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीला आळा घालण्यात यावा या उद्देशाने शेतकऱ्यांच्या सामुहिक मागणीनुसार जळगांव वनविभागाकडून ‘सौर कुंपण साहीत्य’ अर्थातच झटका मशीन मंजुर करण्यात आले आहे.

पट्टेदार वाघांच्या अधिवासास सुप्रसिद्ध असलेल्या आई-मुक्ताई भवानी (वडोदा वनक्षेत्र) व्याघ्र अधिवास क्षेत्रार्तगत असलेल्या डोलारखेडा वनपरीमंडळातील मौजे दुई व सुकळी वनहद्दी लगतच्या शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांकडून वारंवार होणाऱ्या पीक नुकसानीला आळा घालण्यात यावा.

या उद्देशाने संबंधित शेतकऱ्यांच्या सामुहिक मागणीनुसार जळगांव वनविभागाकडून ‘सौर कुंपण साहीत्य’ (झटका मशीन) मंजुर करण्यात आले आहे. इच्छुक १३१ नग सौर साहीत्यासाठी सुमारे १९,६५,००० रुपयाचे ई-टेंडर काढले आहे. शासनाचे परीपत्रक प्राप्त झाल्यावर संबंधित सौर कुंपन साहित्याची वाटप शेतकऱ्यांना केली जाणार असल्याची माहीती जळगांव वनविभागाच्या विश्वसनीय सूत्रांकडून ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ला प्राप्त झाली आहे.

वडोदा वनक्षेत्रात विपुल प्रमाणात विविध वन्यप्राण्यांची संख्या असून डोलारखेडा वनपरीमंडळातील असलेल्या वाघांच्या मुक्त संचारामुळे तृणभक्षक प्राणी सांबर, नीलगाय, हरीण, चितळे, काळवीट, रानडुक्कर आदी तृणभक्षक प्राणी वन हद्दीलगतच्या शेती शिवारात वारंवार शिरकाव करुन शेती पीक नुकसान करतात. परिसरात पाणी उपलब्धता असल्याने बारमाही केळीसह रब्बी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.वाघाचा मुक्त संचार असल्याने भीतीपोटी शेतकरी रात्री पीक सरंक्षणार्थ शेतात जाण्यास धजावत नाही. तसेच झालेल्या पीक नुसानीची भरपाई वनविभागाकडून तोडक्याच स्वरुपात मिळते. शिवाय वेळोवेळी नुकसान होऊनही शासन निर्णयानुसार वर्षभरातून फक्त एकदाच नुकसान भरपाई मिळते. यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला होता. तालुक्यातील मौजे सुकळी व दुई येथील वन हद्दीलगतच्या शेतकऱ्यांनी याबाबत जळगांव वनविभागाचे उपवनसऱक्षक विवेक होसिंग यांच्याकडे सामुहिक मागणी केली होती.

त्या अनुषंगाने विवेक होसिंग यांनी वन हद्दीलगतच्या वन्यप्राण्यांकडून वारंवार नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेत प्रयत्न केले. सौर साहित्य पुरवठ्याबाबत ई-टेंडर काढले असून शासनाच्या परीपत्रकाची प्रतीक्षा असून परिपत्रक निघाल्यावर सौर साहीत्यांची वाटप होणार आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या असलेल्या जाचातून सुटका मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Protected Content