Home क्राईम आठ दिवसांपासून बेपत्ता महिलेचा पद्मालयात मृतदेह ; नातेवाईकांकडून सखोल चौकशीची मागणी

आठ दिवसांपासून बेपत्ता महिलेचा पद्मालयात मृतदेह ; नातेवाईकांकडून सखोल चौकशीची मागणी

0
1


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी, रेणुका नगर परिसरातील ३८ वर्षीय कविता अरुण मिस्तरी या महिला घरातून गेल्यानंतर बेपत्ता झाल्या होत्या. तब्बल आठ दिवसांनंतर पद्मालय परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त करत प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कविता मिस्तरी या नरेंद्र सोनवणे यांच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून परिचित होत्या. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर नातेवाईकांनी या घटनेबाबत संशय व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी नरेंद्र सोनवणे हा कविता यांच्या घरी आला होता. कविता यांच्या आईला दवाखान्यात घेऊन जाण्याचे सांगून त्याने कवितांना सोबत नेल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतर कविता मिस्तरी या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

नातेवाईकांनी परिसरासह विविध ठिकाणी शोध घेतला. मात्र, कविता यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने अखेर पोलिस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी तपास सुरू केला.

दरम्यान, पोलिसांकडून शोध सुरू असतानाच पद्मालय परिसरात कविता मिस्तरी यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावले. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली.

कविता यांच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असून, या प्रकरणाची सर्व बाजूंनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. नरेंद्र सोनवणे यांची चौकशी करून या प्रकरणात त्यांचा सहभाग आढळून आल्यास त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

कविता यांच्या बहिणी रेखाबाई मिस्तरी आणि बहिणीचा मुलगा प्रसाद मिस्तरी यांनीही या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. दोषी व्यक्ती कोणतीही असो, तिच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, कविता मिस्तरी यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला आणि या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. मृतदेहाच्या तपासणीसह उपलब्ध माहिती आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके सत्य स्पष्ट होणार आहे.


Protected Content

Play sound