


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील विविध बस स्थानकांवर गर्दीचा फायदा घेत महिलांचे मंगळसूत्र, सोन्याची पोत आणि चैन चोरी करणाऱ्या सराईत संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली. सागर दादासाहेब जाधव (वय ३१, रा. खर्डे, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
१२ सप्टेंबर रोजी जळगाव मुख्य बस स्थानकावर एलसीबीचे पथक गस्त घालत असताना जाधव संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने बस स्थानकांवरील गर्दीचा फायदा घेत दागिने चोरी केल्याची माहिती दिली. पंचांसमक्ष त्याच्या बॅगेची झडती घेतली असता सोन्याचे दागिने आढळून आले.
चौकशीत त्याने मुक्ताईनगर बस स्थानकावर एका महिलेचे मंगळसूत्र, एरंडोल बस स्थानकावर एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन, तर जामनेर बस स्थानकावर दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क साधल्यानंतर मुक्ताईनगर, एरंडोल आणि जामनेर पोलीस ठाण्यात दाखल तीन गुन्हे उघडकीस आले. आरोपीकडून एकूण २७ ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे ४ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील कारवाईसाठी आरोपीला एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार आणि एलसीबी पथकाने केली.



