


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एकल महिलांच्या समस्या, गरजा तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती नोंदविण्याच्या उद्देशाने नगरसेवक सैयद वासिफ अली निसार अली (वासिफ सर) यांच्या पुढाकाराने दोन नि:शुल्क एकल महिला सर्वेक्षण सहाय्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
६ सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या शिबिरात १२०, तर १३ सप्टेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या शिबिरात ३५२ महिलांनी सर्वेक्षण फॉर्म भरून सहभाग नोंदविला. दोन्ही शिबिरांत एकूण ४७२ महिलांनी लाभ घेतला.
महिलांकडे आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती उपलब्ध नसल्याचे लक्षात घेऊन शिबिरात नि:शुल्क झेरॉक्स सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. फॉर्म भरणे, कागदपत्रांची पूर्तता आणि सर्वेक्षण प्रक्रियेसाठी नगरसेवक वासिफ अली यांच्या टीममधील १६ स्वयंसेवकांनी दिवसभर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
गरजू महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी योग्य माहितीची नोंद व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. यापुढेही नागरिकांच्या मदतीसाठी असे उपक्रम सुरू ठेवण्याची भावना नगरसेवक वासिफ अली यांनी व्यक्त केली.



