


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव ग्रामीण रुग्णालयात तब्बल १८ वर्षे सेवा बजावणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव यांची शासकीय नियमानुसार पदोन्नतीने तालुका आरोग्य अधिकारी, पाचोरा या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या बदलीमुळे भडगावच्या आरोग्यसेवेत मोठी उणीव निर्माण झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
२००८ पासून भडगाव येथे कार्यरत असताना डॉ. जाधव यांनी गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य रुग्णांना आपुलकीने सेवा दिली. २४ तास रुग्णसेवेसाठी तत्पर राहिल्याने त्यांनी नागरिकांचा मोठा विश्वास संपादन केला. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता फ्रंटलाइन कोरोना योद्धा म्हणून रुग्णांची सेवा केली.
काही वर्षांपूर्वी त्यांची भडगाव येथून बदली झाल्यानंतर सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी एकत्र येत बदली रद्द करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. नागरिकांच्या आग्रहामुळे त्यांना पुन्हा भडगाव येथे सेवा देण्याची संधी मिळाली होती.
डॉ. जाधव यांनी भडगाववासीयांचे आभार मानताना, “रुग्णांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे हास्य हीच माझ्या वैद्यकीय आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. भडगावच्या मातीने दिलेले प्रेम मी कधीही विसरणार नाही,” असे भावुक उद्गार काढले.
आता पाचोरा तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा संपूर्ण तालुक्याला होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. डॉ. जाधव यांच्या पुढील वाटचालीसाठी भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील नागरिकांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.



