


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । करंजी बु. येथील ८५ वर्षीय वैजंताबाई गणपत माळी यांचे अपहरण करून दागिन्यांसाठी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तब्बल ४० दिवसांनी उलगडा झाला असून, जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पारोळा पोलिसांच्या संयुक्त पथकाने संशयित प्रशांत उत्तम माळी (४०, रा. मुकटी, ता. धुळे) याला जेरबंद केले आहे.
वैजंताबाई ३ ऑगस्ट रोजी सकाळी घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या चुलत पुतण्याने ९ ऑगस्ट रोजी पारोळा पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी करंजी, पारोळा, अमळनेर, धरणगाव, धुळे, जळगाव आदी परिसरातील सुमारे १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच सुमारे २५० किलोमीटरचा मागोवा घेत तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशांतने नातेवाईकाचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती देऊन वैजंताबाईंना कारमध्ये बसवले. त्यानंतर दागिन्यांची मागणी केली. मात्र, त्यांनी दागिने देण्यास नकार दिल्याने ४ ऑगस्टच्या पहाटे धुळेजवळील नंदाळे फाट्याच्या परिसरात रुमालाने गळा आवळून त्यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले. मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून नंतर कानळदा फाट्याजवळील सिमेंटच्या चारीत टाकल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीच्या माहितीनुसार चारीतून मानवी अवशेष हस्तगत करण्यात आले असून ते वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दागिने विविध ठिकाणी विकल्याचे तसेच काही दागिने लपविल्याचे आरोपीने सांगितल्याने पोलिसांकडून मुद्देमाल जप्तीची कारवाई सुरू आहे.
या प्रकरणात सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासातून हत्या व मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे स्पष्ट झाल्याने आता संबंधित गंभीर कलमे वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे. कर्जबाजारीपणामुळे दागिन्यांच्या हव्यासातून ही हत्या केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.



