बोदवड नगरपंचायत : राष्ट्रवादीच्या योगीता खेवलकर विजयी

बोदवड प्रतिनिधि | बोदवड नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणीस प्रारंभ झाला असून यातील पहिला निकाल हा राष्ट्रवादीकडे गेला असून प्रभाग क्रमांक तीनमध्ये या पक्षाच्या योगीता खेवलकर यांनी विजय मिळविला आहे.

याबाबत वृत्त असे की, बोदवड येथील नगरपंचायत निवडणुक ही दोन टप्प्यात झाली होती. यातील पहिला टप्पा २१ डिसेंबर तर दुसरा टप्पा काल म्हणजे १८ जानेवारी रोजी झाला होता. यात बहुरंगी लढत असली तरी प्रमुख मुकाबला हा अर्थातच आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार एकनाथराव खडसे यांच्यात होता. रोहिणी खडसे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नाथाभाऊ आणि रोहिणीताईंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर ही मतदारसंघातील पहिलीच निवडणूक असल्याने याच्या निकालाचा आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होणार आहे. यामुळे दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. निवडणुकीच्या दरम्यान नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक केली. यात पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि रोहिणी खडसे यांना शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी धमकावल्याचे प्रकरण खूप गाजले. या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

यानंतर आमदार गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे ही निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली. एकीकडे भाजप-सेना युती तुटली असतांनाही बोदवड येथे मात्र दोन्ही पक्षांचे नेते एकत्रीत आल्याचा संदेश सर्वत्र गेला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी याचे खंडण केले असले तरी यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

या सर्व घटनांच्या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. यात प्रभाग क्रमांक ३ मधुन राष्ट्रवादीच्या योगीता गोपाळ खेवलकर यांनी विजय मिळविला. त्यांना ४०५ मते मिळाली. तर शिवसेनेच्या सुजाता खेवलकर यांना ३८५ आणि भाजपच्या कविता जैन यांना १६४ मते मिळालीत.

Protected Content