बोदवडमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेत रस्सीखेच : अनुक्रमे तीन व दोन जागांवर विजय

बोदवड प्रतिनिधी | बोदवड नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणीस प्रारंभ झाला असून यातील पहिल्या सहा जागांचे निकाल जाहीर करण्यात आले असून यात राष्ट्रवादीला तीन शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत. तर एका ठिकाणी राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवारांना समसमान मते मिळाली आहेत.

याबाबत वृत्त असे की, बोदवड येथील नगरपंचायत निवडणुक ही दोन टप्प्यात झाली होती. यातील पहिला टप्पा २१ डिसेंबर तर दुसरा टप्पा काल म्हणजे १८ जानेवारी रोजी झाला होता. यात बहुरंगी लढत असली तरी प्रमुख मुकाबला हा अर्थातच आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार एकनाथराव खडसे यांच्यात होता. रोहिणी खडसे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नाथाभाऊ आणि रोहिणीताईंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर ही मतदारसंघातील पहिलीच निवडणूक असल्याने याच्या निकालाचा आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होणार आहे. यामुळे दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. निवडणुकीच्या दरम्यान नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक केली. यात पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि रोहिणी खडसे यांना शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी धमकावल्याचे प्रकरण खूप गाजले. या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

यानंतर आमदार गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे ही निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली. एकीकडे भाजप-सेना युती तुटली असतांनाही बोदवड येथे मात्र दोन्ही पक्षांचे नेते एकत्रीत आल्याचा संदेश सर्वत्र गेला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी याचे खंडण केले असले तरी यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

 

या सर्व घटनांच्या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. यात प्रभाग क्रमांक १ मधुन शिवसेनेच्या रेखा सोनू गायकवाड यांनी विजय मिळविला. त्यांना ४६६ मते मिळालीत तर त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रमीला संजय वराडे (मते २७९) यांना पराभूत केले.

 

प्रभाग क्रमांक २ मधुन राष्ट्रवादीचे कडूसिंग पांडुरंग पाटील हे ३३७ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सचिन सुभाष देवकर (मते २३३) यांना पराभूत केले.

 

प्रभाग क्रमांक ३ मधुन राष्ट्रवादीच्या योगीता गोपाळ खेवलकर यांनी विजय मिळविला. त्यांना ४०५ मते मिळाली. तर शिवसेनेच्या सुजाता खेवलकर यांना ३८५ आणि भाजपच्या कविता जैन यांना १६४ मते मिळालीत.

 

प्रभाग क्रमांक ४ मधून  राष्ट्रवादीचे सैयद सईदाबी रशीद या ५११ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेचे कुरेशी सलीमाबी शेख कलीम  २११ मते यांना पराभूत केले.

 

प्रभाग क्रमांक ५ मधून गोपाळ बाबूराव गंगतीरे आणि भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना समसमान ३७४ मते मिळाली आहेत.

 

प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसेनेच्या पूजा प्रितेश जैन या ३०२ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या सरीता संदीप जैन (मते २९६) यांना पराभूत केले.

Protected Content