बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेतील आमदगाव धरणाच्या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात परिसरातील शेतकर्यासह धरणे आंदोलन करण्यात आले.
या संदर्भातील वृत्त असे की, १९९९ साला पासून मंजूर असलेल्या बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेचे उदघाटन माजी राष्ट्रपती सौ.प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते २०१० मध्ये करण्यात आले होते. पाच तालुक्यातील ४२ हजार हेक्टर जमीन या प्रकल्पामुळे सिंचनाखाली येणार असून २३ वर्षांपासून मंजूर असलेला हा प्रकल्प अद्यापही अपूर्णच आहे. या योजनेचे काम दोन टप्प्यात विभागले गेलेले आहे या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम अपूर्ण असून दुसर्या टप्प्यातील आमदगाव जुनाने धरणाचे काम जवळपास ६०% च्या वर पूर्ण झालेले आहे.
सदर धरणाच्या डाऊन स्ट्रीम मध्ये म्हणजे मुरूम व ब्लॅक सॉईल च्या मध्ये ग्राउंड लेव्हल पासून धरणाच्या भिंतीच्या टॉप लेव्हल पर्यंत एक ते दीड मीटर रुंद सँड फिल्टर टाकणे धरणाच्या भिंतीची उत्तम दर्जा व गुणवत्ता साठी अंदाज पत्रकानुसार बंधनकारक होते. परंतु प्रत्यक्ष धरणाच्या भिंतीवर डाऊन स्ट्रीम बघितली असता ब्लॅक सॉईल व मुरूम मध्ये सँड फिल्टर फक्त फोटो सेशनसाठीच नावापुरते टाकण्यात आलेले असून शासनाकडून या सँड फिल्टरच्या पोटी कोट्यावधींचे चे देयके वसूल करण्याचा प्रयत्न सदर ठेकेदाराकडून विभागीय अधिकार्यांच्या आर्थिक भागीदारीने करण्यात आलेला आहे. धरणाच्या भिंतीची गुणवत्ता व दर्जा ढासळवण्याचे काम करण्यात आले असल्याच्या दिसून येत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे, सचिन पाटील शशिकांत कळसकर, गजानन सोनवणे,बहादूर पाटील ,निलेश पाटील, विकी सोनवणे, नरेंद्र कळसकर ,चेतन पाटील, निखिल पाटील ,योगेश शेळके, विजू चव्हाण, भागवत पाटील व परिसरातील आदी शेतकरी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.