मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी ‘माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) आणि पदवी परीक्षेत ‘प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ ही शैक्षणिक अट लागू करण्यात आली होती. ही एक अट आता महानगरपालिका प्रशासनाने रद्द केली आहे. त्यामुळे आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या १५ दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेत लिपीक पदाच्या १८४६ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. या जागांसाठी राज्यभरातून तरुण-तरुणींनी अर्ज सादर केले होते. मात्र बीएमसीने पहिल्या प्रयत्नात दहावी पास होण्याची अट घातल्याने हजारो उमेदवारांना अर्ज भरता आला नव्हता. महापालिकेच्या या जाचक अटी विरुद्ध राज्यभरातून तीव्र संताप करण्यात आला. अनेक राजकीय नेत्यांनीही या मुद्द्यावरून प्रशासनावर टीका केली होती. आता अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर महापालिकेने परिपत्रक जारी करत उमेदवारांना गुड न्यूज दिली आहे. लिपीक पदाच्या या भरतीसाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील’प्रथम प्रयत्नात’ही अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, राज्यभरातील लाखो बेरोजगार तरुण-तरुणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी २० ऑगस्ट २०२४ पासून भरती प्रक्रिया राबवली होती. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले होते. या भरतीसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही शैक्षणिक अट लागू होती. हा जाचक अट रद्द करण्याची मागणी अनेक स्तरातून होत होती. याचा विचार करत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.