राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर; रावेरात सस्पेंस कायम

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पाच मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आल्या आहेत. बारामतीमधून सुप्रिया सुळे, वर्धामधून अमर काळे, अहमदनगरमधून निलेश लंके, शिरूरमधून अमोल कोल्हे, दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही नावे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घोषित केली.

आमदारकीचा राजीनामा देऊन अजित पवार गट सोडून शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके यांना अहमदनगमधून उमेदवारी आली आहे तर काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या अमर काळे यांना वर्ध्यामधून उमेदवारी देण्यात आली आहे. वर्ध्यातून सोशल मीडीया स्टार नितेश कराळे गुरूजी इच्छूक होते त्यांनी अमर काळेसोबत पक्षात प्रवेश ही केला होता, पण त्यांना अखेर डावण्यात आले आहे.

जळगाव जिल्हयातील रावेर मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केला नाही. या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. रावेरमधून भाजपने एकनाथराव खडसे यांची सून रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. पण राष्ट्रवादीने आतापर्यंत या मतदारसंघातून कोणाचेही नाव अदयाप जाहीर केले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देते याबाबत संभ्रम कायम आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अँड. रवींद्र पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

Protected Content