काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सहा नेत्यांची नावे चर्चेत

मुंबई: वृत्तसंस्था । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या सहा नेत्यांची नावे चर्चेत असून महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षश्रेष्ठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे

बाळासाहेब थोरात रविवारपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. पक्षाच्या तीन तीन जबाबदाऱ्या झेपणं अवघड जात असल्याने प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी ते दिल्लीत आले आहेत. काल त्यांनी पक्षाचे नेते राजीव सातव यांची भेट घेऊन चर्चा केली. आता ते पवनकुमार बन्सल आणि के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन राजीनामा सोपवणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. थोरात हे दिल्लीत राजीनामा देण्यासाठी गेल्याचं वृत्त बाहेर येताच काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

सध्या तरी काँग्रेस नेते सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर या राज्यातील नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. नाना पटोले, राजीव सातव आणि पृथ्वीराज चव्हाण या राष्ट्रीय स्तरावरील राज्यातील नेत्यांची नावेही प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडण्याची शक्यता असून सातव, चव्हाण आणि पटोले यांच्यापैकी एका नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे जाण्याची शक्यता असल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाना पटोले सुद्धा असले तरी त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता कमीच असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस महाविकास आघाडीत सामिल झाल्यावर त्यांच्या वाट्याला काही मंत्रिपदं आली. त्यावेळी मंत्रिपदं देताना ज्या नेत्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाणार नाही, अशा नेत्यांनाच मंत्रिपदं देण्यात आले. पटोले यांनाही विधानसभा अध्यक्षपद दिलं. त्यामुळे त्यांच्याकडील विधानसभेचं अध्यक्षपद काढून प्रदेशाध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता कमी असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत पृथ्वीराज चव्हाण आणि राजीव सातव हे सर्वाधिक दावेदार असल्याचं मानलं जात आहे. नव्या सरकारमध्ये चव्हाण यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं. तर महाविकास आघाडीत काँग्रेसला दुय्यम स्थान दिलं जात असल्याने तिन्ही पक्षात उत्तम समन्वय साधण्यासाठी सातव हे उत्तम पर्याय असल्याने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. सातव यांचे ठाकरे आणि पवारांशी चांगले संबंध असल्याने त्याचा काँग्रेसला आगामी काळात फायदा होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद जाऊ शकतं, असं राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

Protected Content