राज्याच्या अर्थसंकल्पाची उत्सुकता शिगेला

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर केला जाणार असून यात नेमक्या कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अर्थमंत्री अजित पवार सकाळी ११ वाजता विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री शंभुराज देसाई विधानपरिषदेत सन २०२०- २१ चा अर्थसंकल्प सादर करतील. राज्याचा मावळता अर्थसंकल्प सुमारे २८ हजार कोटींच्या तुटीत गेला आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेची गती काहीशी मंदावली आहे. मार्चअखेर अर्थव्यवस्थेची वाढ ही ५.७ असण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यावरील कर्जाचा बोजा हा ४ लाख ७१ हजार कोटींवर गेला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरील ताण वाढला असताना महाविकास आघाडी सरकारला राज्यातील जनतेचे समाधान करावे लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी योजना सुरू केली असून या योजनेचा विस्तार अर्थसंकल्पात अपेक्षित आहे. ही योजना जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावर राबविण्याचा विचार सुरू आहे. परिणामी या योजनेसाठी वाढीव तरतूद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी आकस्मिकता निधीतून १५ हजार कोटींची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी आणखी तरतूद होण्याची शक्यता आहे. तर आपला पहिला अर्थसंकल्प लोकप्रिय ठरावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही नवीन योजनांची घोषणाही करण्याची शक्यता आहे.

Protected Content