पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ऐन रब्बी हंगामात महावितरणला वारंवार भेडसावणाऱ्या विजेच्या समस्यांविरोधात आज दि. 15 मार्च रोजी शहरातील भाजप कार्यालय “अटल” ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या विरोधात “महाएल्गार रॅली” व “ढोल बजाव आंदोलन” करण्यात आले.
यावेळी पिंपळगाव – शिंदाड गटाचे जि. प. सदस्य मधुकर काटे, गोविंद शेलार, भडगाव तालुका अध्यक्ष अमोल पाटील, पंचायत समितीचे सभापती बन्सीलाल पाटील, बाजार समितीचे सभापती सतिष शिंदे, प्रदिप पाटील, प्रज्ञावंत आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनिल पाटील, बल्लाळेश्वर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील, शहर सरचिटणीस दिपक माने, समाधान मुळे, ज्ञानेश्वर सोनार, सिध्दांत पाटील, भाजपा पाचोरा – भडगाव किसान मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यां सह पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ट्रान्सफार्मर (डी.पी.) वरून होणारी वीज कनेक्शन तोडणी त्वरित थांबवावी, कृषिपंपांचा वीजपुरवठा ८ तास नियमित व योग्य दाबाने अखंडित देण्यात यावा, नादुरुस्त ट्रान्सफार्मर डी. पी. ४८ तासांत दुरुस्त करून देण्यात यावी, जुलमी पद्धतीने होणारी वीज बिल वसुली तात्काळ थांबावी. या मागण्यांसंदर्भात भाजपातर्फे राज्य सरकारच्या निषेधार्थ भव्य अशा महाएल्गार रॅली व ढोल बजाव आंदोलन छेडण्यात आले.
या आंदोलनात “या आघाडी सरकार चे करायचे काय ? खाली डोकं वरती पाय”, “ठाकरे सरकार हाय हाय”, “नाकर्त्या राज्य सरकारचा निषेध असो”, “टक्केवारी आमदाराच करायचं काय, खाली डोकं वर पाय”, “काठावर पास आमदाराच करायचं काय, खाली डोकं वर पाय”, शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा खुर्ची खाली करा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.