राज्यात भाजपचाच होणार मुख्यमंत्री; अजित पवार-एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे एकमत झाले असून त्यांनी देवेंद्र फडणवीसयांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय शिंदे यांना योग्य तो सन्मान देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. आता येत्या दोन दिवसांत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी सुरू आहे. त्याचवेळी नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभाग शिवसेनेला देण्याचे मान्य करण्यात आले आहे. याशिवाय गृह आणि महसूल ही खाती भाजप स्वतःकडे ठेवणार आहे. महायुतीच्या मंत्रीमंडळात मराठासोबतच ओबीसींनाही योग्य प्रतिनिधित्व दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. याशिवाय मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे मित्रपक्षांकडून सांगण्यात आले असून, यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे एकमत झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तथापी, अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असून नगरविकास मंत्रालय शिवसेनेला देण्यात येणार आहे. भाजप स्वत: कडे गृह, ग्रामविकास आणि महसूल खाते कायम ठेवणार आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक चांगली आणि सकारात्मक असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, आणखी एक बैठक घेतली जाईल, ज्यामध्ये मुख्यमंत्रिपदाची भूमिका कोण घेणार याचा निर्णय होईल. बैठक चांगली आणि सकारात्मक होती. ही पहिलीच बैठक होती. आमची अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. महायुतीची आणखी एक बैठक होणार आहे. या बैठकीत कोण कोण असेल याचा निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांची बैठक मुंबईत होणार असल्याचेही यावेळी शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

प्राप्त माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनीही विधान परिषदेचे सभापतीपद आपल्या पक्षाला मिळावे, असा आग्रह कायम ठेवला आहे. बैठक संपवून अजित पवार आणि फडणवीस मुंबईला रवाना झाले. शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या घरी खासदारांची बैठकही घेतली आणि त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले.

Protected Content