बदलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूर येथील शाळेतील घडलेल्या प्रकरणानंतर बदलापूर मधील नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी रेल्वे ट्रॅक वरती रेलरोको आंदोलन सुरू केले आहे. सरकार या आरोपीला जोपर्यंत फाशी देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या आंदोलकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंती करून देखील ते आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याने अखेर मंत्री गिरीश महाजन हे बदलापूर स्थानकावर दाखल झाले आहेत.
गिरीश महाजन हे आंदोलन तात्काळ मागे घेण्याची विनंती नागरिकांना करत आहे. या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांना आजच्या आज निलंबित करण्यात येईल, असे आश्वासन देखील महाजन यांनी दिले आहे. बदलापूर येथील घटनेबाबत जी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे, तीच भावना सरकारची देखील आहे. आम्ही देखील याप्रकरणी तात्काळ कारवाई करणार आहोत. मात्र त्यासाठी संपूर्ण मुंबईतील लोकांना वेढीस धरणे योग्य नाही. सकाळपासून मुंबईतील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रेलरोको आंदोलन तात्काळ मागे घ्यावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.