गुजरातमध्ये भाजप सुसाट : हिमाचलात ‘कांटे की टक्कर’ !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गुजरात विधानसभेत भाजप सलग सातव्यांदा सत्तारूढ होणार असल्याचे स्पष्ट झाले असतांना हिमाचलमध्ये मात्र कॉंग्रेसने जोरदार टक्कर दिल्याचे दिसून आले आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथे नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. यामुळे त्यांच्या वर्चस्वाला विरोधक आव्हान देणार का ? हा खरा प्रश्‍न यावेळेस होता. हिमाचल प्रदेशमध्ये ६८ जागांसाठी १२ नोव्हेंबरला मतदान झाले होते. तर गुजरातमध्ये १८२ जागांसाठी १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले होते.

यातील गुजरातची निवडणूक ही पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी खूप महत्वाची मानली जात आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व करत एकूण ३० प्रचारसभा आणि रोड शो केले. तर, गृहमंत्री अमित शहा यांनी येथील प्रचाराच्या नियोजनाची मुख्य धुरा सांभाळली होती. मतदान संपल्यानंतर विविध संस्थानी जाहीर केलेल्या एक्झीट पोलमध्ये भाजपला मोठा विजय मिळवणार असल्याचे दर्शविण्यात आले होते.

या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. यात गुजरातमधील सर्वच्या सर्व म्हणजे १८२ जागांचे कल समोर आले आहेत. यात भारतीय जनता पक्षाला १३०, कॉंग्रेसला ४४; अपक्षांना ४ तर आम आदमी पक्षाला ४ जागेवर आघाडी मिळाली आहे. जागा थोड्याफार कमी-जास्त झाल्यात तरी येथे भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तारूढ होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, हिमाचलमध्ये मात्र सत्तारूढ भाजपला कॉंग्रेसने मोठ्या प्रमाणात झुंजविले आहे. येथील सर्व म्हणजे ६८ जागांचे कल समोर आले आहेत. यात कॉंग्रेस ३३, भाजप ३२ तर अपक्ष ३ अशांना आघाडी मिळाली आहे. अर्थात, येथे प्रचंड चुरशीचा मुकाबला होत असून एक-दोन जागा इकडे-तिकडे झाल्यात तरी सत्तेचे समीकरण बदलणार आहे. येत्या काही तासात येथील चित्र स्पष्ट होईल.

अर्थात, गुजरातमध्ये भाजपची सत्ता कायम राहणार असून हिमाचलमध्ये मात्र अद्याप पर्यंत चित्र स्पष्ट नसल्याचे दिसून येत आहे.

Protected Content