पोटनिवडणुकीत भाजप पराभूत झाल्यानेच इंधन दरांमध्ये कपात : मलिक

मुंबई प्रतिनिधी | महागाईमुळे पोट निवडणुकांमध्ये भाजपला दणका बसल्यानेच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझलचे भाव कमी केले असल्याचा टोला अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांनी मारला आहे.

केंद्र सरकारने काल पेट्रोल आणि डिझलचे दर कमी केले. यावर नवाब मलिक यांनी निशाणा साधलाय. भाजपाला तुम्ही जितका वेळ पराभूत करणार तितका पेट्रोल  डिझेलचा भाव कमी होत राहणार. ही लूट थांबवायची असेल तर भाजपाला पराभूत करा, असे आवाहन  मलिक यांनी जनतेला केले आहे. देशभरात अनेक राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचे मंगळवारी निकाल जाहीर झाले. हिमाचल प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. तर निवडणुकांच्या निकालानंतर दुसर्‍याच दिवशी दरात कपात करण्यात आल्याने विरोधक भाजपावर निवडणूक हरल्यामुळे दरात कपात केल्याची टीका करत आहेत.

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करताना पेट्रोलचा भाव ५ रुपयांनी कमी केला तर डिझेलचा भाव १० रुपयांनी कमी केला. यामुळे केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर जी लूट केली जात होती ती काही प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान जनतेला केंद्रसरकारची ही दिवाळी गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे. परंतु ही दिवाळी गिफ्ट नाही या देशात ङ्गभाजप हराओ दाम घटाओफ असे आंदोलन सुरू करण्यात आल्यावर हे भाव कमी झाले आहेत, असं नवाब मलिक म्हणाले.

केंद्राने बुधवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर पाच रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी केले. काही तासांनंतर, उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलवरील व्हॅट सात रुपये आणि डिझेलवर दोन रुपयांनी कमी करण्यात आला. अशा प्रकारे दोन्ही इंधनांच्या किमती येथे प्रतिलिटर १२-१२ रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यानंतर, कर्नाटक, गोवा, त्रिपुरा आणि आसामच्या सरकारांनी दोन्ही इंधनांनच्या करात आणखी कपात केली. यानंतर आता महाराष्ट्र काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांनाच नवाब मलीक यांनी केंद्र सरकारवर टीका केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

Protected Content