भाजपने केली चार बंडखोरांची हकालपट्टी

bjp

मुंबई, वृत्तसंस्था | भाजप-शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या चार कार्यकर्त्यांवर पक्षाने कारवाई करीत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार या चार जणांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती आज पक्षाकडून देण्यात आली आहे.

 

भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या बंडखोरामध्ये तुमसरमधील चरण वाघमारे, मीरा भाईंदरमधील गीता जैन, पिंपरी चिंचवडमधील बाळासाहेब ओव्हाळ आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर मतदारसंघातील दिलीप देशमुख या चार जणांचा यात समावेश आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना तिकिट देण्याऐवजी भाजपने प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिल्याने चरण वाघमारे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी अपक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी दाखल केली आहे. तर भाजप सेना महायुतीच्या उमेदवाराविरोधात पिंपरी विधानसभा मतदार संघात बंडखोरी करणाऱ्या आणि भाजप चिन्हावर पिंपरी चिंचवड महापालिकेत निवडून आलेल्या बाळासाहेब ओव्हाळ यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे. पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंडखोर उमेदवारांनी आपला अर्ज मागे घ्यावा अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दसरा मेळाव्यातून तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्यांची माफी मागितली होती. फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतरही शिवसेना-भाजपमधील असंतुष्ट नेत्यांनी काही ठिकाणी बंडखोरी केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेने सावंत यांचे तिकीट कापून या मतदारसंघातून महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना तिकीट दिले आहे. महाडेश्वर हे शिवसेनेचे सचिव अनिल परब यांच्या जवळचे असल्यानेच सावंत यांचा पत्ता कापल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसनेही केली दोघांची हकालपट्टी
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या दोन बंडखोरांची काँग्रेसने आज हकालपट्टी केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या राम रतन बापू राऊत, आणि भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघातून बंडखोरी करणाऱ्या सेवकभाऊ वाघाये या दोघांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड.गणेश पाटील यांनी दिली आहे.

Protected Content