विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

मुंबई प्रतिनिधी । विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

भाजपाकडून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी शिरीष बोराळकर, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संग्राम देशमुख, नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी संदीप जोशी तर अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी नितीन धांडे यांच्या उमेदवारीची घोषणा आज केंद्रीय पातळीवरून करण्यात आली आहे. १ डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून गेले होते. पाटील गेल्यावर्षी विधानसभेवर निवडून गेल्याने विधानपरिषदेची जागा रिक्त होती. या पुण्याच्या जागेसाठी कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली जाईल असंही बोललं जात होतं मात्र त्यांना डावलून सांगलीतील संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघातून सध्याचे आमदार अनिल सोले यांच्या ऐवजी संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेना पुरस्कृत शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे हे आमदार असून येथून भाजपाने या मतदारसंघात नितीन धांडे यांना उमेदवारी दिली आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी भाजपाचे शिरिष बोराळकर यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा शिरीष बोराळकर यांना संधी दिली आहे.

Protected Content