भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक गंभीर जखमी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात रेमंड चौफुली जवळ भरधाव वाहनाने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या बारावी परीक्षेच्या बैठक व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी हे दोघे तरुण जळगावला येत होते, अशी माहिती समोर आली आहे.

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव मोहित संजय मोरे (वय २०, रा. उमाळा, ता. जळगाव) असे आहे. मोहित आपल्या कुटुंबासोबत राहत होता आणि तो फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्यासोबत गौरव अशोक पाटील (वय १८, रा. उमाळा) हा देखील होता, हा बारावीचा विद्यार्थी आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षांसाठी बैठक व्यवस्था पाहण्यासाठी ते दोघे जळगाव येथे येत असताना हा भीषण अपघात घडला.

दुपारी साधारणतः सोवारी १० फेब्रुवारी रोजी १ वाजेच्या सुमारास हे दोघे दुचाकीवरून जात असताना एका हॉटेलजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही जोरात रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले. लगेचच त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी ४ वाजताच्या सुमारास मोहित मोरे याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मोहितच्या मृत्यूची वार्ता कळताच कुटुंबीयांमध्ये एकच आक्रोश केल्याचे दिसून आले. त्याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला. जखमी गौरव पाटीलवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.