मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वरळीत एका बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृ्त्यू झाला आहे. विनोद लाड असे या तरूणाचे नाव आहे. बीएमडब्ल्यू च धडक इतक्या जोरात होती की विनोदला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले, येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही बीएमडब्ल्यू कार ठाण्यातील व्यावसायिकाची आहे. अपघातावेळी चालक गाडी चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मूळचा मालवण येथील रहिवासी असलेल्या विनोद ठाण्यात ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक पदावर कामाला होता. तो ए.जी. खान अब्दुल गफारखान मार्गावरून घरी चालला होता. 20 जुलै रोजी कामावरून घरी परतत असताना त्याच्या दुचाकीचा बीएमडब्ल्यू कारने पाठीमागून धडक दिली. तो खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. धडक देणारी कार तिथून पळून गेली, परंतू मागून येणाऱ्या एका वाहनचालकाने थांबवून त्याला नायर रुग्णालयात नेले. येथे विनोदवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आठ दिवस विनोद मृत्यूशी झुंज देत होता. अखेर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली.
कारचा मालक हा ठाण्यातील अत्तर व्यावसायिक असल्याची माहिती आहे. वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये व्यावसायिकाचा कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यासाठी ते वरळीमध्ये आले होते. दरम्यान अपघात घडला त्यावेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर मोटरगाडी चालवत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. विनोदचा चुलत भाऊ किशोर लाड याच्या तक्रारीवरून याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.