
यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात मोठी घडामोड समोर आली असून, सोमवारी तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या १० गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. सभापतीपद हे यंदा ‘सर्वसाधारण’ ठेवण्यात आल्याने अनेक दिग्गज नेत्यांच्या गणांना आरक्षण लागल्यामुळे त्यांच्या राजकीय आशा मावळल्या आहेत. त्यामुळे आता नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार की पुन्हा घराणेशाहीच पाहायला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आरक्षण जाहीर करताना प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आरक्षणाची यादी सादर केली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये काही गणांवर अनुसूचित जाती-जमाती व महिला आरक्षण लागू झाल्याने दिग्गज नेत्यांची गणराजकीय समीकरणांमधून बाद झाल्याचे दिसून आले.
किनगाव, साकळी, दहिगाव, डांभुर्णी व भालोद या प्रमुख गणांवर काँग्रेस आणि भाजपचे अनेक संभाव्य दावेदार सभापतीपदासाठी तयारीत होते. मात्र, त्यांच्या गणांना राखीव आरक्षण लागू झाल्याने त्यांच्या राजकीय आकांक्षांना तडा बसला आहे. विशेषतः महिला आरक्षणामुळे काही बडे नेते बाजूला राहणार आहेत. तथापि, ते आपल्या निकटवर्तीयांना किंवा विश्वासू कार्यकर्त्यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे निवडणुकीची लढत अधिक चुरशीची होणार आहे.
पाडळसे, मारुळ आणि न्हावी हे गण सर्वसाधारण किंवा नामनिर्देशित असल्याने या ठिकाणच्या इच्छुक उमेदवारांची चांगलीच चलबिचल सुरू झाली आहे. सभापतीपदासाठी प्रमुख दावेदार म्हणून या गणांतील उमेदवारांची चर्चा असून, पक्षीय बैठका व गटबाजीचे सूर जोरात घुमत आहेत. या पार्श्वभूमीवर, आगामी आठवडे तालुक्यात राजकीयदृष्ट्या अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
दरम्यान, न्हावी गावातील काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते भाजपमध्ये दाखल झाल्याने तालुक्यात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांत काँग्रेसमधून भाजपकडे वळालेल्या नेत्यांच्या संख्येत झालेली वाढ भाजपसाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे. त्यामुळं यंदाची पंचायत समिती निवडणूक भाजप अधिक आक्रमकतेने लढवेल, असा अंदाज राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला आहे.
आरक्षणामुळे सावखेडा सीम या नेहमीच चर्चेत राहणाऱ्या गणातील भाजप-काँग्रेस यांच्यातील थरारक लढत यंदा होणार नसली तरी या ठिकाणी नव्या नेतृत्वाची चाचणी होणार असल्याने या जागेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
एकंदर आरक्षणाची यादी पाहता, अनुसूचित जाती-जमाती आणि महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे दिग्गजांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल की पक्षांतर्गत वंशपरंपरेच्या आधारावर उमेदवारी दिली जाईल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय हालचालींना सुरुवात झाली असून, येत्या काळात तालुक्यातील चित्र आणखी स्पष्ट होईल. यावेळी भाजपकडे अधिक गती असली तरी काँग्रेसनेही संघटनात्मक तयारी सुरू केल्याने एकतर्फी लढत होणार नाही, असेही जाणकार सांगत आहेत. आरक्षण जाहीर होताच निवडणुकीचे ढोल वाजायला सुरुवात झाली असून, यावल तालुक्यातील राजकारणात नव्या समीकरणांची नांदी झाली आहे.



