Home करियर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या पात्रतेत बदल

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या पात्रतेत बदल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिक्षण घेत असतानाच देशातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी आता अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी खुली झाली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत (PMIS) महत्त्वाचा बदल करत पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनाही अर्जासाठी पात्र करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच उद्योगविश्वाचा अनुभव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने उच्च शिक्षण विभाग आणि शिक्षण मंत्रालयाशी सल्लामसलत करून पात्रतेच्या निकषांमध्ये ही सुधारणा केली आहे. यापूर्वी नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होता येत नव्हते. मात्र, नव्या नियमांनुसार १८ ते २५ वयोगटातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी PMIS पोर्टलद्वारे देशातील प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकणार आहेत.

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या इंटर्नना १२ महिन्यांसाठी दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. याशिवाय रुजू होताना एकरकमी ६ हजार रुपये देखील मिळणार आहेत. विशेष म्हणजे २५ पेक्षा अधिक क्षेत्रांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध असून संबंधित कंपन्यांकडून अतिरिक्त लाभही दिले जाणार आहेत.

सरकारच्या मते, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच उद्योग क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव मिळेल. राष्ट्रीय शिक्षण धोरणात अनुभवाधारित शिक्षण, इंटर्नशिप आणि उद्योग सहभागावर भर देण्यात आला असून ही योजना त्या उद्दिष्टाला पूरक ठरणार आहे.

अर्ज करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्थेकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) सादर करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच इंटर्नशिपमुळे अभ्यासात कोणताही अडथळा येणार नाही, याचीही खात्री करावी लागणार आहे.

पात्रतेचे प्रमुख निकष असे — अर्जदाराचे वय १८ ते २४ वर्षे असावे, तो नोकरीत नसावा, पदवी किंवा पदव्युत्तरच्या अंतिम वर्षात असावा किंवा शिक्षण पूर्ण केलेले असावे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि आई-वडील किंवा जोडीदार यांपैकी कोणीही सरकारी सेवेत नसावे.

सध्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या प्रायोगिक टप्प्याची तिसरी फेरी सुरू असून या बदलामुळे लाखो विद्यार्थ्यांसाठी करिअर घडवण्याची नवी दारे खुली झाली आहेत.


Protected Content

Play sound