जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. ‘कापूस उत्पादकता अभियान सन २०२६-२७’ अंतर्गत कापूस पिकाच्या काढणीनंतर होणारे नुकसान कमी करणे, शेतीतील मूल्यवर्धनाला चालना देणे आणि यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी बायोचार युनिट आणि कॉटन श्रेडर या घटकांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, बायोचार युनिटच्या माध्यमातून कापूस पिकाच्या पऱ्हाट्यांचा प्रभावी वापर करून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविणे, जमिनीची सुपीकता सुधारण्यास मदत करणे आणि शेतीची उत्पादकता वाढविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या घटकासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र ठरणार आहेत. लाभार्थ्यांना प्रति युनिट रु. १०,००० किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे.

कापूस शेतीमध्ये आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढावा आणि काढणीनंतरच्या अवशेषांचे प्रभावी व्यवस्थापन व्हावे, यासाठी कॉटन श्रेडर या घटकाचाही समावेश करण्यात आला आहे. या घटकाची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (SMAM) योजनेच्या धर्तीवर केली जाणार आहे. यासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रातील सहकारी संस्था अर्ज करू शकतील.
अनुदानाच्या स्वरूपात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के किंवा कमाल ०.७५ लाख रुपये प्रति युनिट, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ४० टक्के किंवा कमाल ०.६० लाख रुपये प्रति युनिट इतके अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना आधुनिक यंत्रसामग्री खरेदीसाठी आर्थिक दिलासा मिळणार आहे. दोन्ही घटकांसाठी लाभार्थ्यांची निवड ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS)’ या तत्त्वावर महाडीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. हे अनुदान क्रेडिट-लिंक्ड बॅकेंडेड सबसिडी स्वरूपाचे असल्याने लाभार्थ्यांनी बँकेचे कर्ज घेणे अनिवार्य राहणार आहे. तसेच एकाच यंत्रासाठी किंवा बाबीसाठी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून अनुदान घेतल्यास या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी जिल्ह्यातील पात्र शेतकरी, शेतकरी गट, एफपीओ आणि सहकारी संस्थांनी वेळ न दवडता महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. योजनेबाबत अधिक माहिती, पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.



