पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिद्द, मेहनत आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याची परंपरा कायम ठेवत राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी एका गरीब विद्यार्थ्याच्या उल्लेखनीय यशाची दखल घेत त्याचा विशेष सन्मान केला. नगाव (ता. जि. धुळे) येथील महाविद्यालयातील द्वितीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी पुरुषोत्तम प्रदीप पाटील याने कुलगुरू युवा प्रेरणा शिबीर २०२६ मध्ये ‘सर्वोत्तम स्वयंसेवक’ हा बहुमान पटकावल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कबचौ उमवि तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कुलगुरू युवा प्रेरणा शिबीर २०२६ मध्ये राज्यातील विविध भागांतून सुमारे २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या शिबिरात उत्कृष्ट शिस्त, नेतृत्वगुण, सामाजिक सहभाग आणि स्वयंसेवक म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या जोरावर पुरुषोत्तम प्रदीप पाटील याची ‘सर्वोत्तम स्वयंसेवक’ म्हणून निवड करण्यात आली. त्याच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरुषोत्तमच्या या यशाची दखल घेत राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी धुळे येथील आपल्या निवासस्थानी त्याला विशेष निमंत्रित केले. यावेळी त्यांनी पुरुषोत्तमचा अभिनंदनपत्र, गौरवपत्र आणि ₹५०० चे रोख पारितोषिक देऊन सन्मान केला. तसेच त्याच्या पुढील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले.

या सन्मानामुळे भावूक झालेल्या पुरुषोत्तम पाटील यांनी भावसार सरांचे मनःपूर्वक आभार मानले. त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीय आणि प्रा. अमृत निंबा वळवी यांनीही भावसार सरांनी विद्यार्थ्यांच्या यशाची घेतलेली दखल ही प्रेरणादायी असल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली. विशेष म्हणजे, सदानंद धडू भावसार यांनी आतापर्यंत शिक्षण, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तब्बल १,०९९ विद्यार्थ्यांचा सन्मान केला आहे. गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या या उपक्रमाचे शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सातत्याने कौतुक केले असून, त्यांच्या कार्याला समाजातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.



