नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नीट परीक्षेत झालेल्या घोळाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. नीट परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. नीट परीक्षा पुन्हा घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. परीक्षा पुन्हा घेतली तर त्याचे मोठे परिणाम होतील, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे.
सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, न्यायालयाला असे वाटते की या वर्षासाठी नीट यूजी फेरपरीक्षा घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. जे या परीक्षेला बसणाऱ्या २४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडेल आणि प्रवेश प्रक्रियेत देखील व्यत्यय निर्माण होईल. भविष्यात वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमावर आणि भविष्यातील डॉक्टरांवर त्याचा मोठा परिणाम होईल.वैद्यकीय शिक्षणात जागा वाटपात आरक्षण ठेवण्यात आले आहे, त्यांच्यासाठी देखील हे हानिकारक ठरेल, असं सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटलं आहे.