नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | १८ मार्च रोजी सोमवार रोजी आज लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सहा राज्यातून गृह सचिवांना तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत. आज नवे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्यासह मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक झाली.
यावेळी आयोगाने राज्य सरकारच्या निवडणुकीशी संबधित आणि कामाशी संबधित आधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांमधील गृह सचिवांना हटवण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याशिवाय अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनाही हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.