रावेरातून शरद पवार गटातर्फे अतुल पाटील यांच्या तिकिटाचे संकेत !

यावल-अय्यूब पटेल | भाजपने रावेरसाठी पुन्हा एकदा रक्षाताई खडसे यांना तिकिट दिल्यानंतर त्यांच्या समोर शरद पवार गटातर्फे अतुल पाटील यांना तिकिट मिळणार असल्याचे संकेत मिळाले असून याबाबत आज त्यांची शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

आज भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या दुसर्‍या यादीत रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना पक्षाने तिसर्‍यांना तिकिट दिले आहे. खरं तर हा निर्णय तसा अनपेक्षितच मानला जात असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यातच आता त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने नेमके कोण आव्हान देणार याकडे देखील लक्ष लागले आहे.

कालच एकनाथ खडसे यांनी जळगावातील पत्रकार परिषदेत पक्षातर्फे चार-पाच जण इच्छुक असल्याचे सांगितले होते. यात स्वत: खडसे यांच्यासह रवींद्रभैय्या पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील, माजी आमदार अरूण पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य एस.एस. राणे, रमेश पाटील आदींची नावे त्यांनी घेतली होती. तर भुसावळ येथील मुस्लीम समाजातील एक मोठा कंत्राटदार देखील तिकिटसाठी इच्छुक असल्याचे नाथाभाऊंनी नमूद केले, मात्र त्याचे नाव सांगितले नाही. दरम्यान, रवींद्रभैय्यांनी लढण्यास नकार दिला असून आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच निवडणुकीच्या रिंगणात उतरू असे नाथाभाऊंनी स्पष्ट केले.

या पार्श्‍वभूमिवर, आज महाविकास आघाडीच्या वतीने हालचाली गतीमान झाल्या आहेत. नाशिक येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. यात शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी अतुल पाटील यांच्याशी उमेदवारीच्या संदर्भात चर्चा केली. यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता बळावली आहे. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आज बैठकीत चर्चा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच पक्षाने आदेश दिल्यास आपण लढण्यासाठी सज्ज असल्याचे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले. यामुळे रक्षा खडसे यांच्या विरोधात अतुल पाटील अशी लढत रावेरमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Protected Content