रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यप्रदेशातील सातपुडा भागात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रावेर तालुक्यातील सुकी नदीला जोरदार पूर आला आहे. पावसाच्या तीव्रतेमुळे नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून उटखेडा आणि सावखेडा या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होते.
प्रशासनाने परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी शशिकांत चौधरी यांनी गारबर्डी धरणावरून एक मिटर पाणी ओव्हरफ्लो होत असल्याची माहिती दिली आहे. यामुळे आसपासच्या भागात पाण्याची पातळी आणखी वाढू शकते. प्रशासनाने नदीकाठच्या गावांमध्ये खबरदारीचे उपाय सुरू केले असून, मदत आणि बचाव कार्याची तयारी सुरू केली आहे. पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत.