मोठी बातमी : ट्रक मागे घेताना धडक दिल्याने सुरक्षारक्षकाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । कंपनीत माल उतरविण्यासाठी आलेला ट्रक मागे घेत असतांना त्याची सुरक्षा रक्षकाला धडक लागली. यामध्ये ते जमिनिवर कोसळून गंभीर जखमी झाल्याची घटना एमआयडीसीमधील एम स्टेक्टरमधील जीबी इंडस्ट्रिजमध्ये गुरुवारी दुपारी घडली. उपचार सुरु असतांना सुकदेव आनंदा सापकर (वय ६५, रा. तुळजाईनगर कुसुंबा) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील तुळजाई नगरात सुकदेव सापकर हे वृद्ध वास्तव्यास असून ते एमआयडीसीतील एम सेक्टरमधील जीबी इंडस्ट्रीजमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करीत होते. कंपनीत (एमएच २८ बीबी ५३९९) क्रमांकाच ट्रक माल उतरविण्यासाठी आला होता. ट्रक चालक हा ट्रक मागे घेत असतांना कंपनीच्या गेटवर ड्युटी करीत असलेल्या सापकर यांना ट्रकची धडक लागल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, कामगारांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सापकर यांची प्राणज्योत मालवली.
…ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

घटनेची माहिती सापकर यांचा मुलगा देवेंद्र याने त्यांचे मेव्हणे ज्ञानेश्र्वर हरणकर यांना दिली. त्यांनी लागलीच पत्नीसह रुग्णालयात धाव घेतली. यावेळी कंपनीचे मालक गितेश मुंदडा यांनी त्यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्यानुसार हरणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content