मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महाराष्ट्राची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून महाविकास आघाडीतील जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरु होते. गेल्या तीन दिवसांपासून सलग बैठका घेतल्या जात होत्या. आजच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यानुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस १०० ते १०५ जागा, ठाकरे गट ९५ ते १०० जागा तर शरद पवारांची राष्ट्रवादी ८५ ते ८० जागांवर लढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील बैठकीमध्ये मुंबईतील ३६ पैकी २३ जागांचा तिढा सुटला आहे. यानुसार ठाकरेंची शिवसेना १३, काँग्रेस ८, शरद पवारांची राष्ट्रवादी केवळ १ जागा लढणार आहे.
त्याचबरोबर मुंबईत मविआतील घटक पक्ष समाजवादी पक्षालाही एक जागा दिली आहे. घाटकोपर पूर्व जागा राष्ट्रवादी पवार गटाला तर शिवाजीनगरची जागा समाजवादी पार्टीला मिळाली आहे. मातोश्रीवर राज्यभरातील विधानसभानिहाय स्थितीचा आढावा घेण्यात आला. गेल्या १० दिवसापासून मातोश्रीवर राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेऊन विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला.