मोठी बातमी: वीज कोसळल्याने नातवाचा जागीच मृत्यू तर आजोबा गंभीर जखमी

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : मक्याच्या शेतात आजोबांसोबत राखण करण्यासाठी केलेल्या १५ वर्षीय मुलाच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी ३१ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. तर सोबत असलेले ५५ वर्षीय आजोबा गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अंकुश विलास राठोड (वय १५, रा.धानवड ता. जळगाव) असे मयत झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धानवड गावात अंकुश राठोड हा मुलगा आपले आई-वडील, भाऊ बहीण आणि आजोबा यांच्यासोबत वास्तव्याला होता. त्यांचे धानवड धरणाजवळ शेत असून अंकुश हा रोज आजोबा शिवाजी जगराम राठोड यांच्यासोबत शेतात राखण्यासाठी जात होता. नेहमीप्रमाणे अंकुश हा आज सोमवारी ३१ मार्च रोजी देखील आजोबा शिवाजी राठोड यांच्यासोबत शेतात गेलेला होता. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट झाल्याने त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत अंकुश राठोड याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे आजोबा शिवाजी राठोड हे गंभीर जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खाजगी वाहनातून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी अंकुश याला तपासणी केले असता मयत घोषित केले. तर जखमी झालेल्या शिवाजी राठोड यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Protected Content