जळगावात राजकीय पारा चढला : राऊत-पाटील यांच्यात अटीतटीचा ‘सामना’ !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचे जळगावात आगमन होताच त्यांचा शिंदे गटातर्फे काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. तर यातून राऊत आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यातील सामना रंगणार असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे.

उद्या पाचोरा येथे उध्दव ठाकरे यांची सभा होत असून याच्या पूर्वतयारीसाठी खासदार संजय राऊत हे शुक्रवारी रात्री जळगावात दाखल झाले. त्यांचे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जोरदार स्वागत केले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकीकडे राऊत यांचे स्वागत होत असतांना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करत राऊत यांचा निषेध केला. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर राऊत यांनी केलेल्या टिकेचा जोरदार घोषणाबाजी करून याप्रसंगी निषेध करण्यात आला. तर दोन्ही गटांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली असतांना पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले. याप्रसंगी जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला. या माध्यमातून संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये सामना झाल्याचे दिसून आले.

( पहा : ना. गुलाबराव पाटील समर्थकांनी खा. संजय राऊत यांचा केलेला निषेध )

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/178416954689090

खासदार संजय राऊत आणि ना. गुलाबराव पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार शाब्दीक चकमकी सुरू आहेत. राऊत यांनी चौकटीत राहून बोलावे अन्यथा आपण त्यांच्या सभेत शिरू असे आव्हान गुलाबराव पाटलांनी दिले. यावर राऊतंनी जोरदार प्रत्युत्तर तर दिलेच पण यात गजानन मालपुरे यांनीही एंट्री केली. गुलाबराव पाटील जर सभेत शिरले तर आपण त्यांना ५१ हजार रूपयांचे बक्षीस देऊ अशी घोषणा त्यांनी केली. यानंतर गुलाबराव पाटील यांनी आपण सभेत शिरणार नसून आधी सैनिक जातात मग सरदार जातात असे वक्तव्य करून यु-टर्न घेतला. यानंतर दोन्ही नेत्यांमधील वाद शांत होईल असे मानले जात होते. तथापि, रात्री ना. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांचा आक्रमक पवित्रा पाहता आग अजून विझलेली नसल्याचे स्पष्णपणे अधोरेखीत झाले आहे.

आज सकाळी संजय राऊत हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. यात ते कालच्या प्रकारासह गुलाबराव पाटील यांच्यावर घणाघातील हल्ला चढवण्याची शक्यता आहे. तर. पालकमंत्री देखील याला उत्तर देतील असे मानले जात आहे. अर्थात, या सर्व घडामोडींमुळे ऐन उन्हाळ्यात जळगावातील राजकीय पार चढल्याचे देखील दिसून आले आहे.

Protected Content