काँग्रेसला जोरदार धक्का; अंबरनाथ काँग्रेस शहराध्यक्ष 12 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार


ठाणे -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. भाजपने काँग्रेसला मोठा धक्का देत पक्षांतराची खेळी साधली असून, निवडणुकीपूर्वीच राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. काँग्रेसमधील एका मोठ्या गटाचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची घोषणा झाल्याने निवडणूक रणधुमाळीला नवे वळण मिळाले आहे.

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असून प्रचाराचा जोर वाढला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार येत्या 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांत उमेदवारीवरून नाराजीचे सूर उमटत आहेत. अनेक ठिकाणी तिकीट न मिळाल्याने इच्छूक नाराज झाले असून, काही ठिकाणी पक्षाच्या सभांमध्ये गोंधळ तर काही ठिकाणी नेत्यांच्या वाहनांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सगळ्या गदारोळात पक्षांतराचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

सध्याच्या घडीला सर्वाधिक इनकमिंग भाजपमध्ये होत असल्याचे चित्र आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अंबरनाथ काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील हे आपल्या 12 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ऐन महापालिका निवडणुकीआधी होणारा हा पक्षप्रवेश काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर प्रदीप पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ब्लॉक अध्यक्ष पदासाठी आपल्याकडे एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. युतीसंदर्भात आपण आधीच नेतृत्वाला माहिती दिली होती, मात्र त्यानंतरही आपल्यावर अन्यायकारक कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने निवडणुकीच्या प्रक्रियेत एकदाही आपल्याशी चर्चा केली नाही आणि आम्ही आमच्या जोरावर निवडून आलो असल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदीप पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या घडामोडीमुळे अंबरनाथसह संपूर्ण राज्यातील महापालिका निवडणुकीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्येही भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले होते. आता महापालिका निवडणुकीदरम्यानही हीच प्रवृत्ती कायम असल्याचे दिसत आहे. मात्र दुसरीकडे भाजपमध्ये तिकीट न मिळालेल्या इच्छूकांमध्ये नाराजी वाढत असल्याने पक्ष नेतृत्वासमोरही आव्हान उभे राहिले आहे.