सायकल चोराला अटक; चोरीच्या दोन सायकली हस्तगत


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा येथील मयूर कॉलनी परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी सायकल चोरी करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या दोन महागड्या सायकली हस्तगत करण्यात आल्या असून, जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २६ हजार रुपये आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गजेंद्र कुमार चुडामण महाजन (वय ४५, रा. मोहाडी रोड, आदर्शनगर, जळगाव) यांनी आपल्या मुलाची सायकल चोरी झाल्याची फिर्याद दिली होती. त्यांच्या मुलाने २७ मे रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत गायत्रीनगर, शिरसोली रोड येथे सायकल लावली होती, जी नंतर चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी २७ मे रोजी सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एमआयडीसी पोलीसांनी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे बुधवारी २८ मे रोजी पहाटे १.१५ वाजता आरोपी जयेश अशोक राजपूत (वय १९, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) याला मयूर कॉलनी, पिंप्राळा येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून ११ हजार रुपये किमतीची एक लाल रंगाची न्यू स्पीड कंपनीची सायकल आणि १५ हजार रुपये किमतीची एक सिल्वर रंगाची ह्युज कंपनीची सायकल अशा एकूण २६ हजार रुपये किमतीच्या दोन सायकली जप्त केल्या आहेत.