भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे नगरविकास मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
भुसावळ शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मागणी कधीपासूनच करण्यात येत असली तरी याला अद्यापही परवानगी मिळालेली नाही. यासाठी वंचित बहुजन आघाडीने आधी शहरात आंदोलन देखील केले आहे. या अनुषंगाने आता पुतळा उभारणीस परवानगी द्यावी, या मागणीसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीने मुंबई येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यात पुतळा उभारणीसाठी मंत्रालयीन पातळीवरून तातडीने परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदर परवानगी न दिल्यास आंदोलनाचा इशारा देखील या निवेदनात देण्यात आलेला आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, बालाजी पठाडे, सचिन बार्हे, गणेश जाधव, देवदत्त मकासरे आदींची उपस्थिती होती.