भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोविडच्या आपत्तीमुळे सुमारे सव्वा दोन वर्षांपासून बंद असलेली भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस १० जुलैपासून सुरू होणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
कल्याणमार्गे भुसावळ ते पुणे धावणारी हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वेगाडी अनेक प्रवाशांच्या उपयोगाची आहे. कोविडच्या प्रकोपामुळे मार्च २०२० मध्ये ही ट्रेन बंद करण्यात आली होती. यानंतर बहुतांश गाड्या पूर्ववत सुरू झाल्या तरी अद्यापही ही ट्रेन सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. सध्याची स्थिती पाहता भुसावळ ते मुंबई आणि भुसावळ ते देवळाली पॅसेंजर गाड्यांसोबतच हुतात्मा एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी कधीपासूनच करण्यात येत होती. तथापि, प्रशासनाने याला मंजुरी न दिल्याने मोठी नाराजी आहे. या अनुषंगाने आता ११०२५ अप आणि ११०२६ डाऊन पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस १० जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्याने प्रवाशांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, १० जुलैपासून दररोज हुतात्मा एक्स्प्रेस रात्री १२.३५ वाजता म्हणजेच पूर्वीच्याच वेळेनुसार ही गाडी पुण्याकडे निघेल. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, खंडाळा आणि पुणे असा या ट्रेनचा प्रवास असेल.