Home Cities मुक्ताईनगर भुसावळ रोडवर गटारीच्या घाणीचा विळखा! सकाळपासून कचरा तसाच, नगरपंचायतीचे कर्मचारी गायब!

भुसावळ रोडवर गटारीच्या घाणीचा विळखा! सकाळपासून कचरा तसाच, नगरपंचायतीचे कर्मचारी गायब!

0
15

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नगरपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय भुसावळ रोडवर आला आहे. भंसाली ट्रेडर्ससमोर गटारीतील कचरा आणि घाण थेट रस्त्यावर पडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे, सकाळपासून ही घाण रस्त्यावर पडून असतानाही ती उचलण्यासाठी नगरपंचायतीची कचरा गाडी किंवा संबंधित कर्मचारी अद्याप आलेले नसल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

शहरातील भुसावळ रोड हा वर्दळीचा मार्ग असून, या रस्त्यावरून दिवसभर नागरिक आणि वाहनधारकांची ये-जा सुरू असते. अशा महत्त्वाच्या रस्त्यावरच गटारीतील घाण पडलेली असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. भंसाली ट्रेडर्ससमोरील या प्रकारामुळे परिसरातील व्यापाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, गटारीतील घाण रस्त्यावर नेमकी कशी आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कचरा संकलन करणाऱ्या गाडीतूनच गटारीतील घाण रस्त्यावर पडली असावी, असा संशय स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळपासून रस्त्यावर घाण पडून असतानाही ती उचलण्यासाठी नगरपंचायतीची कचरा गाडी किंवा स्वच्छता कर्मचारी फिरकलेले नाहीत, अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. शहरातील अस्वच्छतेची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचत नाही का? की तक्रारींची दखल घेण्यासाठी प्रशासनाला आणखी किती वेळ लागणार? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

एकीकडे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची असताना दुसरीकडे मुख्य रस्त्यावरच गटारीतील कचरा पडून राहतो आणि तो उचलण्यासाठीही कर्मचारी येत नाहीत, ही बाब स्वच्छता व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. शहरातील स्वच्छता केवळ कागदोपत्री आणि जाहिरातींपुरती मर्यादित आहे का, अशी टीकाही नागरिकांकडून होत आहे.

रस्त्यावर पडलेली घाण तातडीने उचलून परिसराची स्वच्छता करावी, तसेच हा प्रकार कसा घडला याची चौकशी करून निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नगरपंचायत प्रशासन नेमके करते तरी काय? गटारीतील घाणीची जबाबदारी कोण घेणार? सकाळपासून पडलेला कचरा उचलण्यासाठी कर्मचारी कधी येणार? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

मुक्ताईनगर शहरातील स्वच्छता व्यवस्था सुधारण्याच्या केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छता दिसणे अपेक्षित आहे. भुसावळ रोडवरील भंसाली ट्रेडर्ससमोरील घाण तातडीने हटवून नगरपंचायत प्रशासन संबंधितांवर कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound