मुख्यमंत्र्यांचा धक्का : अनिल चौधरींना की अजून कुणाला ?

Bhusawal भुसावळ-इकबाल खान (स्पेशल रिपोर्ट ) | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल चौधरी यांनी आयोजीत केलेल्या कार्यक्रमाला हजेरी न लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांनी हा धक्का फक्त प्रहार जनशक्तीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांनाच दिला की अजून कुणाला ? याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. जाणून घ्या या संदर्भातील लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे दणदणीत राजकीय भाष्य.

प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍यात भुसावळ शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात नियोजीत कार्यक्रमात भुसावळहून दोन हजार दुचाकीस्वारांची मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या पुढे दुचाकी रॅली काढण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते. तथापि, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी दिव्यांगांना मोफत ई-बाईक वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला. अर्थात, यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाईक वाटप करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आलेले होते. याची अतिशय जय्यत तयारी देखील झाली होती.

भुसावळ शहरातील आगामी नगरपालिका निवडणुकीत चौधरी बंधूंनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आपला एक ‘हुकमी पत्ता’ हाताशी धरून ठेवल्याचे आता उघड झाले आहे. अर्थात, राष्ट्रवादीत नाथाभाऊंनी संतोषभाऊ समर्थकांना झुकते माप दिले नाही तर चौधरी समर्थक हे प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतील ही बाब अगदी उघड आहे. यामुळे भुसावळ शहरात थेट मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत भव्य कार्यक्रम घेऊन माहोल तयार करणे आणि आगामी निवडणुकीत याचा उपयोग करून घेणे या हेतूने अनिल चौधरी आणि त्यांच्या समर्थकांनी या कार्यक्रमाची जोरदार तयारी केली होती.

प्रत्यक्षात मात्र नेमके काय झाले ते कुणालाच कळले नाही. मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा हा महामार्गावरून खाली उतरण्याऐवजी थेट उड्डाण पुलावरून पुढे निघून गेला. काही अंतरावर मुख्यमंत्र्यांनी भुसावळातील भाजप पदाधिकार्‍यांचा सत्कार स्वीकारून ते पुढे निघून गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विमानतळ ते पाळधी आणि पाळधी ते मुक्ताईनगर या प्रवासात अगदी लहान-सहान समुहाचा सत्कार स्वीकारत गेले. मात्र प्रहार जनशक्तीच्या कार्यक्रमाला टाटा करून ते पुढे का निघून गेले ? याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते.

अनिल चौधरी यांचे टार्गेट हे रावेर-यावल विधानसभा मतदारसंघ असला तरी भुसावळ हा त्यांचा प्राण आहे. यामुळे यंदाच्या पंचवार्षिकमध्ये काहीही करून सत्ता मिळवायचीच असा चंग दोन वेगवेगळ्या पक्षात असणार्‍या चौधरी बंधूंनी बांधला आहे. या दृष्टीने तयारी सुरू असतांना मुख्यमंत्र्यांचे पाठबळ असल्याचे दाखविल्याचा भविष्यात लाभ होणार असल्याचे गणीत त्यांनी नक्कीच मांडले असणार. मात्र, पडद्याआड असे काही शिजले की, मुख्यमंत्री येथे न थांबता पुढे निघून गेले.

विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी भुसावळातील कार्यक्रमाला थांबण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी विरोध केला. भाजप आमदारांच्या मतदारसंघात प्रहार जनशक्तीला बळ देणे हे ‘पॉलिटिकल इनकरेक्ट’ ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी समजून घेतले. अनिल चौधरी यांचे मंत्री गिरीश महाजन हे मित्र असले तरी त्यांनी सुध्दा यात हस्तक्षेप केला नाही. कारण प्रश्‍न हा पक्षाचा होता. तर शिंदे गटाचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सुध्दा अनिल चौधरी यांच्या पारड्यात शब्द टाकला नाही. यामुळे अर्थातच, एकनाथ शिंदे हे कार्यक्रमाला थांबले नाहीत. मात्र या सर्व, गदारोळात अजून दोन आयाम तपासून पाहण्याची गरज आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रीपद न भेटल्याने त्रस्त आहेत. त्यांनी आपला त्रागा जाहीरपणे व्यक्त केला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाला न येतांना त्यांना देखील योग्य तो ‘संदेश’ दिल्याचे मानले जात आहे. तर, ज्या आमदार चंद्रकांत पाटलांनी मुक्ताईनगरात कार्यक्रम घेतला ते देखील अनिलभाऊंचे जिगरी दोस्त असतांनाही मुख्यमंत्री येथे थांबले नाहीत, याचा अर्थ, त्यांना देखील एकनाथ शिंदे यांनी योग्य तो ‘संदेश’ दिला असाच होतो. याचमुळे अनिल चौधरी आणि त्यांच्या समर्थकांना कार्यक्रम आवरावा लागला.

अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भुसावळसह यावल, रावेर, फैजपूर नगरपालिकांसह या तीन तालुक्यांमधील जि.प. व पंचायत समित्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यांनी याची तयारी देखील सुरू केली आहे. याआधी आपले चकचकीत ‘ब्रँडींग’ करण्याची नामी संधी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातून मिळाली होती. मात्र कुठे तरी माशी शिंकली आणि हा कार्यक्रम रद्द झाला. यातून अनिल चौधरी यांना आगामी काळात आपली रणनिती बदलावी लागणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात आता नव्यने पट मांडण्यात आलेला आहे. यात मित्र कोण आणि शत्रू कोण हे अद्यापही स्पष्ट झालेले नसतांनाच निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यामुळे सर्वच आघाड्यांवर संभ्रमाचे वातावरण आहे. अनिल चौधरी हे राजकारणातील कसलेले पैलवान आहेत. आपल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या न येण्यामुळे झालेल्या हानीसाठी ते अजून काही तरी नक्कीच करतील. ते काय असेल ? हे आजच सांगता येणार नाही. मात्र नक्कीच काही तरी घडेल हे नक्की. . .!

Protected Content