दीपनगरच्या प्रकल्पात स्थानिक बेरोजगारांना मिळणार संधी- उमेश नेमाडेंचे प्रयत्न

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे स्थानिक पातळीवर रोजगार गेलेल्यांना दीपनगर येथील प्रकल्पात रोजगार उपलब्ध होणार असून या संदर्भात माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पाठपुरावा केला आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या कोरोनाच्या आपत्तीमुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. यामुळे भुसाळसह परिसरातील अनेकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. यात स्थानिक पातळीसह बाहेर गेलेल्यांचा रोजगार हिरावण्यात आलेला आहे. यामुळे दीपनगर येथे सुरू असलेल्या ६६० मेगावॅट क्षमतेच्या नवीन प्रकल्पात स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे एका पत्राच्या माध्यमातून केली आहे.

या अनुषंगाने उर्जा खात्याकडून उमेश नेमाडे यांना नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. यात नेमाडे यांनी मागणी केल्यानुसार दीपनगरच्या प्रकल्पात यापुढे स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे नमूद केले. हे पत्र दीपनगरच्या मुख्य अभियंत्यांना पाठविण्यात आले आहे. या संदर्भात उमेश नेमाडे म्हणाले की, ना. प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या मागणीची दखल घेतल्याचा आनंद आहे. आता दीपनगरच्या प्रशासनाने स्थानिकांना प्राधान्य देण्याची आवश्यकता नाही. प्रशासन परिसरातील बेरोजगारांना प्राधान्य देते की नाही ? यावर आपण लक्ष ठेवणार आहोत.

Protected Content