कोरोनाच्या तिसऱ्या म्युटेंटची एन्ट्री? भारतात धास्ती वाढली

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाची चिंता वाढवली आहे.  कोरोनाची रुग्णवाढ कशी रोखायची हा  आरोग्य प्रशासनापुढील यक्ष प्रश्न आहे. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या म्युटेंटने देशाची चिंता आणखी वाढवली आहे.

 

दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढ या राज्यांतून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये ट्रिपल म्युटेंटची लक्षणे आढळली आहेत. या राज्यांमधून 17 नमुने घेण्यात आले होते. त्या नमुन्यांच्या अहवालातून ट्रिपल म्युटेंटचा धडकी भरवणारा निष्कर्ष समोर आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. या राज्यांमध्येच आधीच कोरोनाची दुसरी लाट प्रचंड फैलावली आहे. सगळीकडे मोठी रुग्णवाढ होत आहे. अशातच आता ट्रिपल म्युटेंटच्या एन्ट्रीची बातमी पुढे आल्यामुळे या राज्यांची चिंता आणखी वाढली आहे. सध्या भारतात महाराष्ट्रासह 18 पेक्षा अधिक राज्यात डबल म्युटेंट वेरिएंट आढळला आहे. डबल म्युटेंट वेरिएंट म्हणजे एकाच व्यक्तीला कोरोनाच्या दोन वेगवेगळ्या वेरिएंटची लागण. याची तीव्रता कैक पटीने अधिक आहे. त्यामुळे तिसऱ्या म्युटेंट किती घातक असेल, याची नुसती कल्पना करणेही कठिण आहे.

 

 

डबल म्युटेंट व्हेरिएंटला शास्त्रीयदृष्टया B.1.617 असे नाव देण्यात आले आहे. हा म्युटेंट सर्वात आधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निदर्शनास आला होता. सुरुवातीपासूनच हा म्युटेंट घातक होता. त्यामुळे देशात कोरोनाचा मृत्युदर वाढला. हा म्युटेंट रोखण्यास सरकार पातळीवर वेळीच ठोस पावले उचलली गेली नाही. त्यामुळे डबल म्युटेशनपासून आता ट्रिपल म्युटेंटचा धोका निर्माण झाला आहे.

 

ज्यावेळी कोणताही विषाणू त्याच्याविरोधात केल्या जाणाऱ्या उपायांना दाद न देण्याच्या दृष्टीने स्वतःमध्ये काही जनुकीय बदल घडवून आणत असतो, त्याला म्युटेंटची क्रिया म्हटले जाते. म्युटेशन होण्यापूर्वी विषाणूसाठी तयार केलेल्या लशीचा किंवा औषधाचा परिणाम म्युटेशन झालेल्या विषाणूवर होईल का, याची खात्री देवू शकत नाही. जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे अशा प्रकारची म्युटेशन्स शोधण्याचे काम केले जाते. म्युटेशन्स काही वेळा जास्त धोकादायक असू शकतात, तर काही म्युटेशन्स फारसे धोकादायक नसतात. या पार्श्वभूमीवर डबल म्युटेंटप्रमाणेच ट्रिपल म्युटेंटही घातक असेल, तर देशातील कोरोनाचे थैमान इतक्यात थांबण्याची चिन्हे नाहीत

Protected Content