अभिनेते आशिष रॉय यांचं निधन

मुंबई- वृत्तसंस्था । अभिनेते आशिष रॉय यांनी आज अखेरचा श्वास घेतला. आशिष रॉय यांचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झालं. आशिष रॉय बर्‍याच वर्षांपासून किडनीच्या समस्येने त्रस्त होते आणि यावर ते उपचारही घेत होते.

आज त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सीएनटीएएचे वरिष्ठ सहसचिव अमित बहल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. अमित बहल म्हणाले की, ‘आशिष रॉय यांचं घरीच निधन झालं. दिग्दर्शक अरविंद बब्बल यांनी मला फोनवर ही माहिती दिली.’

अनेक सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या आशिष रॉय यांची तब्येत अनेक वर्षांपासून ठीक नव्हती. त्यांच्याकडे उपचारासाठी पैसेही नव्हते. या वर्षी मे महिन्यात, त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून चाहते आणि सहकलाकारांकडे आर्थिक मदत मागितली होती. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे ते डायलिसिसवर होते. याचसाठी त्यांना पैशांची अत्यंत गरज होती.

याच वर्षी जानेवारीत त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. आशिष रॉय यांची तब्येत अचानक खालवू लागली होती, त्यानंतर त्रासाला कंटाळून त्यांनी सोशल मीडियावर देवाकडे लवकर मृत्यू देण्याची प्रार्थना केली होती.

२०१९ मध्ये आशिष रॉय यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. यानंतर त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. एका मुलाखतीत आशिष यांनी म्हटलं होतं की, अर्धांगवायूतून बरं झाल्यानंतर कुठेही काम मिळालं नाही. अखेर त्यांनी जे जमा करून ठेवले होते त्याच पैशांवर ते आपलं आयुष्य जगत होते.

एका मुलाखतीत ते म्हणाले, ‘जर त्यांना काम दिलं नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल आणि आर्थिक मदत न केल्यास त्यांना कोलकाता येथे राहणाऱ्या बहिणीकडे जावं लागेल. आशिष रॉय यांनी सांगितलं होतं की त्यांचं मूत्रपिंड काम करत नाहीत आणि त्यांच्या शरीरात सुमारे ९ लीटर पाणी साचलं होतं. त्यावेळी, डॉक्टर आशिष यांना डायलिसिस द्यायचं की नाही याचा निर्णय घेत होते.

आशिष रॉय यांनी ‘ससुराल सिमर का’, ‘बनेगी अपना बात’, ‘व्योमकेश बक्षी’, ‘येस बॉस’, ‘बा बहु और बेबी’, ‘मेरे अंगने में’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ आणि ‘स्टार्ट’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. हिंदी टीव्ही इण्डस्ट्रीचा ते एक प्रसिद्ध चेहरा होते.

Protected Content