ग्रामीण रूग्णालयात सिव्हील सर्जन यांची झाडाझडती; कोविड व नॉन कोविड रूग्णांवर होणार उपचार

भुसावळ प्रतिनिधी । भाजपच्या वैद्यकीय आघाडीने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन सिव्हील सर्जन डॉ. एन.जी. चव्हाण यांनी आज ग्रामीण रूग्णालयास भेट दिली. यात त्यांनी ग्रामीण रूग्णालयात कोविड भरती व चाचणी तर ट्रॉमा केअरमध्ये नॉन-कोविड रूग्णांवर उपचार करण्याचे निर्देश दिले.

येथील ग्रामीण रूग्णालयातल्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी निर्देश देऊनही नॉन-कोविड रूग्णांची तपासणी करण्यात येत नसल्याचा प्रकार भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी उघडकीस आणला आहे. यात कोविड व नॉन कोविड या दोन्ही प्रकारातील रूग्णांना सेवा मिळावी हे अपेक्षित असतांना तेथे फक्त कोविड रूग्ण चाचणी होत असल्याने इतर रूग्णांची कुचंबणा होत होती.

या संदर्भात भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन आज सिव्हील सर्जन डॉ. एन. जी. चव्हाण यांनी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन झाडाझडती घेतली. त्यांनी संबंधीतांना याबाबत निर्देश दिले. यानंतर त्यांनी ग्रामीण रूग्णालयात कोविड रूग्णांची भरती व चाचणी करण्यात येईल. तर, ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नॉन-कोविड रूग्णांवर उपचार करण्यात येतील असे निर्देश दिले.

दरम्यान, शल्य चिकित्सकांनी दिलेली भेट आणि संबंधीतांना दिलेल्या निर्देशाचे डॉ. नि. तु. पाटील यांनी स्वागत केले आहे. यामुळे कोविड आणि नॉन-कोविड या दोन्ही प्रकारच्या रूग्णांना लाभ होणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. तर या प्रकरणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेतलेल्या दखल बद्दल आभार देखील व्यक्त केले आहेत.

Protected Content