राष्ट्रवादी चषक कबड्डी स्पर्धेस प्रारंभ

भुसावळ प्रतिनिधी | जय गणेश फाऊंडेशनच्या स्पोर्टस क्लबतर्फे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने राष्ट्रवादी चषक कबड्डी स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भुसावळात राष्ट्रवादी चषक जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा (पुरुष गट) आयोजित केली आहे. जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय गणेश फाउंडेशन स्पोर्ट्स क्लबने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उदघाटन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ध्वजारोहण, तर उद्योजक राजेश राका यांनी क्रीडांगण पूजन केले. फाउंडेशनचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर निवृत्त मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर, अशोक लाडवंजारी, अनिल जैन, प्रा.डॉ.सुनील नेवे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, शेख शफी, वसंत पाटील, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह नितीन बरडे यांची उपस्थिती होती.

या स्पर्धेतील पहिल्या दिवशी जळगावच्या क्रीडा रसिक संघाने भुसावळच्या जय मातृभूमी संघाचा, तर जळगावच्या महर्षी वाल्मीक संघाने चाळीसगाव येथील कै. वसंतराव नाईक संघाचा पराभव केला. दोन्ही सामने रंगतदार झाले. स्पर्धेत जिल्ह्यातील २८ संघ सहभागी झाले आहेत. दोन दिवस डे-नाइट हे सामने होत आहेत.

Protected Content