भुसावळात लेडीज रनचे आयोजन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे ५ मार्च रोजी लेडीज रनचे आयोजन करण्यात आले आहे.

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन द्वारा यावर्षी देखील जागतिक महिला दिनानिमित्त ’बीसारा लेडीज इक्वॅलिटी रन’चे आयोजन ५ मार्च रोजी करण्यात येणार आहे. यावर्षी आयोजनाचे हे तिसरे वर्ष आहे. यासंबंधीची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रनिंगचे सत्र समाप्तीनंतर सर्व उपस्थित धावपटूंना व नागरिकांना प्रवीण फालक यांच्यातर्फे देण्यात आली. त्यांच्या समवेत डॉ.चारुलता पाटील, प्रवीण वारके, प्रवीण पाटील उपस्थित होते. या वर्षीच्या आयोजनाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी सर्व पुरुष धावपटू ही स्पर्धा आयोजित करणार असून संघटनेच्या सर्व महिला धावपटू देखील नवीन सहभागी स्पर्धकांसोबत धावतील. त्यामुळे जागतिक महिला दिना निमित्ताने पुरुष धावपटूंतर्फे महिला धावपटूंना आगळीवेगळी भेट दिली जाणार आहे.

या स्पर्धेच्या अंतर्गत ३ किमी, ५ किमी व १० किमी या तीन गटात फक्त महिला व विद्यार्थिनींसाठी आयोजन करण्यात आले आहे. यात ५ किमी व १० किमीच्या अंतरासाठी महिला धावपटूंना टाइमिंग चीप दिली जाणार असून रन संपल्याबरोबर या गटातील धावपटूंना आपले निर्धारित अंतर किती वेळेत पूर्ण झाले याचा संदेश ताबडतोब मोबाईलवर मिळेल. त्याशिवाय प्रमाणपत्र देखील मिळेल जे विविध स्पर्धा परीक्षांच्या मैदानी खेळासाठी उपयोगात येईल अशी माहिती आयोजकांतर्फे दिली गेली.

या स्पर्धेत सहभागी प्रत्येक महिला धावपटूस आयोजकांतर्फे पदक, टी-शर्ट ,प्रमाणपत्र, धावण्याच्या रस्त्यावर पेयजलाची व्यवस्था व नाश्ता दिला जाईल. त्याशिवाय सहभागी स्पर्धकांना भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे संपूर्ण फेब्रुवारी महिना निःशुल्क धावण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी नाव नोंदणी ऑनलाइन व ऑफलाइन फॉर्म भरून करता येईल. ऑफलाइन फॉर्म भुसावळ रनर्सच्या महिला धावपटूंकडे उपलब्ध असतील व ऑनलाइन फॉर्म संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अशी माहिती देण्यात आली.

लेडीज रनच्या माध्यमातून आम्ही ग्रुप सोबत जोडले गेलो व त्यामुळे आमच्या आरोग्यात आमुलाग्र बदल झाला असे यावेळी माधुरी चौधरी, दीपा स्वामी, माया पवार, मंजू शुक्ला व मोनिका देशमुख या महिला धावपटूंनी आपले अनुभव कथन केले. याप्रसंगी प्रियंका मंत्री, डॉ स्वाती फालक, स्वाती भोळे, प्रणोती पाटील, विजया पाटील, मनीषा वशिष्ठ, निर्मला सोनवणे, वर्षा वाडिले आदी महिला धावपटूंसोबतच प्रकाश अटवाणी, सचिन मनवानी, कैलास छाब्रा, राजेंद्र ठाकूर, राकेश चौधरी, श्रीकांत नगरनाईक, राजीव यादव, मुकेश चौधरी, संतोष घाडगे, तरुण बिरिया, विजय फिरके, प्रशांत वंजारी, ताराचंद खरारे, जितेंद्र पाटील, अखिलेश कनोजिया, अभिजीत शिंदे, संजय भदाणे, डॉ निर्मल बलके, आनंद सपकाळे हे धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content