चोरीच्या तयारीत असलेली टोळी गजाआड; शस्त्रे जप्त

भुसावळ प्रतिनिधी | धारदार शस्त्रांचा धाक दाखवून चोरीच्या प्रयत्नात असणार्‍या तिघा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे.

याबाबत वृत्त असे की, शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक बाळासाहेब ठोंबे यांना रात्री साठेआठ वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पुलावर काही तरूण शस्त्रांसह आले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या अनुषंगाने त्यांनी सहाय्यक फौजदार मोहंमद अली सैयद, इकबाल अली सैयद, हेड कॉन्स्टेबल सुपडा पाटील आणि कॉन्स्टेबल सचिन काटे यांना तातडीने तापी नदीच्या पुलावर रवाना केले.

या पथकाने तापी नदीच्या पुलावर तपासणी सुरू केली. याप्रसंगी पोलिसांना पाहून दोन जणांनी फैजपुरच्या दिशेला पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. तर एक जणाला पुलावरच पकडण्यात आले. या चौघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तलवार, चाकू आणि चेन अशी शस्त्रे आढळून आली. पोलिसांनी ही हत्यारे जप्त केली आहेत.

या प्रकरणी जाकीर हारून मन्सुरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम शेखर पाटील (वय१८ वर्षे सहा महिने; रा. अकलूद, ता. यावल) आणि राज रामचरण गुप्ता (वय १९; रा. अकलूद, ता. यावल) या दोघांसह एका अल्पवयीन आरोपीच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे तिन्ही जण चोरी करण्यासाठी भुसावळात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Protected Content