अखेर चोरट्यांनी पळवून नेलेले एटीएम सापडले !

चाळीसगाव प्रतिनिधी | शहरातील खरजई नाक्यावरील एसबीआयचे तब्बल साडे सतरा लाखांची रोकड असणारे एटीएम चोरट्यांनी पळवून नेले होते. यातील रक्कम लंपास करून खाली एटीएम हे नांदगावजवळ आढळून आले असून याचा तपासात उपयोग होण्याची शक्यता आहे.

याबाबत वृत्त असे की, २२ जून रोजी रात्री खरजई नाक्याजवळच्या स्टेट बँकेच्या एटीएममधील मशिनच चोरट्यांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. यात सुमारे साडे सतरा लाख रूपयांची रोकड असल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. ही चोरी करतांना चोरटे एटीएममध्ये असणार्‍या सीसीटिव्हीत कैद झाले होते. मात्र गुन्हा उलटून जवळपास एक महिना होत असतांनाही याबाबतच्या तपासात फारशी प्रगती झाली नव्हती.

या पार्श्‍वभूमिवर, नांदगाव ते मनमाड मार्गावर एका ओसाड ठिकाणी चाळीसगाव येथून पळवून नेलेले एटीएम आढळून आले. याची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे एपीआय सचिन कापडणीस, हवालदार विनोद खैरनार, संदीप भोई, विजय पाटील, ज्ञानेश्वर गिते यांनी एटीएम ताब्यात घेतले. त्यांना एटीएममधील रोकड लंपास करण्यात आल्याचे आढळले. म्हणजेच चोरट्यांनी एटीएम पळवून नेल्यानंतर निर्जन ठिकाणी याला तोडून त्यातील रक्कम चोरून ते फेकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे आता या दरोड्याच्या तपासाला गती येण्याची शक्यता आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!