अक्सानगरमध्ये घर फोडले; रोकडसह दागिने लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अक्सानगरात कुटुंब खालच्या घरात झोपले असताना मध्यरात्री वरच्या रुमच्या खिडकीची जाळी तोडून घरफोडी केल्याची घटना घडली आहे. अज्ञान चोरट्यांनी घरफोडी करत ५० हजार रुपयांची रोकडसह २० ग्रॅम सोन्याचे दागिणे लंपास केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्सानगरातील हॉटेल गुलशन ए हिंद या हॉटेलच्या पाठीमागे राहणारे हारुन मुसा पटेल (वय-५५) यांचे दुमजली घर आहे. पत्नी फातेमा बी, मुलगा आरीफ पटेल, मुलगी सलमा पटेल, जावई आझाद पटेल व नातवंडासह ते वास्तव्यास आहेत. एम.पी अ‍ॅक्वा नावाने त्यांना जारचा व्यवसाय असून घरीच पाण्याचा प्लॉन्ट आहे. शुक्रवारी रात्री हारुन पटेल यांच्यासह कुटुंबिय हे खालच्या घरात झोपले असतांना रात्री ११ वाजेच्या सुमारास वरच्या खोलीत झोपलेल्या सलमा पटेल या सुध्दा  वरच्या खोलीला कुलूप लावून खालच्या खोलीत झोपण्यास आल्या. 

दरम्यान, सकाळी घरासमोर राहणार्‍या तरुणाने वरच्या घराच्या खिडकीची जाळी तुटलेली असल्याची माहिती पटेल कुटुंबियांना दिली. त्यानुसार वरच्या खोली जावून पाहणी केली असता, किचनजवळील रुमचे दोन्ही लाकडी कपाटाची कुलूप तोडून ते उघडलेली होती, तसेच त्यातील तिजोरीचे कुलूप तुटलेले होते, तसेच पलंगांवरील गाद्याही अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. चोरीची खात्री झाल्यावर सलमा पटेल यांनी कपाटात पाहणी केली असता, कपाटाच्या तिजोरीत ठेवलेले जारच्या पाण्याच्या व्यवसायाचे जमविलेले ४० ते ५० हजार रुपयांची रोकडसह सलमा यांच्या कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणेही नव्हते. हा प्रकार शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. यानंतर त्यांनी हा प्रकार भाऊ आरिफ पटेल यांना कळविला. जारचे पोहचवून आरीफ पटेल हे घरी आले. त्यांनीही पाहणी केली. व तक्रारीसाठी वडील हारुन पटेल यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

 

Protected Content